निसर्ग हे एक पुस्तक आहे – ते वाचता आलं पाहिजे.

माननीय खासदार सुनेत्राताईपवार यांच्या मार्गदर्शनाखाली Environmental Forum of India ने डॉ. महेशगायकवाड यांचा नेचरवॉक आयोजित केला होता.
महेश सर आणि मी २००९ साली मनालीजवळ पियांग नूर ब्याली या भागात १० दिवसांचा ट्रेक केला होता. त्यानंतर आता सर पुन्हा भेटले. नेहमीप्रमाणेच त्यांनी निसर्गाची अद्भुत, रम्य आणि गूढ रहस्यं उलगडली.
नक्षत्रगार्डनमध्ये, कोख्या आणि कोकिळेसारख्या पक्ष्यांना साद देत, डॉ. महेश गायकवाड यांनी अतिशय मौल्यवान माहिती दिली. त्या माहितीचा थोडक्यात आढावा घेणारा हा ब्लॉग.
झाडं
१. आपल्या परिसरात स्थानिक झाडं (Native trees) लावावीत. आपल्या मिळणाऱ्या ८०% प्राणवायूचा उगम समुद्रात होतो, पण झाडांमुळे जैवविविधता टिकते आणि वाढते.
२. माळरान हे बारामतीचं दैवत आहे. गावाचं राहणं-सहन हे तिथल्या निसर्गाने प्रेरित असतं. माळरानावर झाडं लावणं म्हणजे निसर्गाशीच नव्हे तर संस्कृतीशीही छेडछाड करणं होय.
३. स्थानिक झाडांवर एक परिपूर्ण ecosystem असतं – जीवजंतू परस्परावलंबी असतात. एक झाड नष्ट झालं, तर संपूर्ण परिसंस्था ढासळते. मारुती चितमपल्ली याला सारंगर म्हणतात.
४. परदेशी झाडं झपाट्याने वाढण्यासाठी फंगसचा वापर करतात. तोच फंगस झाडाला आतून पोकळ करतो – म्हणून ती झाडं वादळ-वाऱ्यात कोसळतात.
५. त्याउलट खैर आणि हिरवसारखी स्थानिक झाडं हळूहळू वाढतात पण अत्यंत मजबूत असतात. खैर १० फूट उंच व्हायला १०० वर्ष लागतात.
६. माळरानावर उगम पावणारी झाडं स्थानिक प्राण्यांना पूरक असतात. उदाहरणार्थ, गझेल (हरीण) आणि बोराटी झाड – गझेल त्याचे पानं खाऊ शकतो आणि बोर खाताना त्याच्या तोंडामुळे बियाणं फुटतं आणि झाड रुजतं.
७. नारळाचंझाड दिवसाला ७०० लिटर पाणी पितं. ते समुद्रकिनाऱ्याचं झाड आहे. शेतात लावल्यास छोट्या नारळांमध्ये रूपांतर होतं आणि पीक मिळत नाही.
८. सुगरणपक्षी सर्वांना आवडतो, पण त्याला आवडणारी झाडं म्हणजे बाभळ आणि बोराटी – त्यांचे काटेरी हिंगण त्याच्या घरट्याला संरक्षण देतात. म्हणून बोराटी अडचण म्हणून कधीही तोडू नका.
९. जगातलं पहिलं झाड म्हणजे फंगस – दगडी फुल. दुसरं मॉस आणि तिसरं लीचेन. त्यानंतरच जैवविविधता उदयाला आली.
१०. कडूलिंब कितीही कडू असलं तरी त्याची फळं अतिशय गोड असतात – डायबेटीससाठी उत्तम औषध! मी चाखून पाहिलं – खरंच गोड होतं 😀
११. वडाच्यापारंब्या वाढाव्यात म्हणून वटपौर्णिमेला वडाभोवती दोरी गुंडाळली जाते – ही परंपरा निसर्गवर्धक आहे.

मुंग्या आणि वाळवी
१. मुंग्या आणि वाळवी हे झाडांचे डॉक्टर आहेत.
२. झाड साल सोडतं तेव्हा वाळवी ती अलगद वेगळी करून टाकते – झाडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त.
३. मुंग्याचं वारूळ जितकं वर दिसतं, तितकंच खालीही असतं – एक शहरच जणू. त्या मशरूमचीशेती करतात, पक्ष्यांना दाण्याचं आमिष दाखवतात आणि त्यांची विष्ठा खत म्हणून वापरतात.
४. वारुळामध्ये पाण्यासाठी बोअर–वेलसुद्धा असते.
५. काही वारुळं तीस लाख वर्ष जुनी आहेत. यावरून असं वाटतं की, माणसाने सभ्यता आणि संस्कृतीचं शिक्षण कदाचित मुंग्यांकडूनच घेतलं असावं.
६. वारूळ वातानुकूलित असतं – राणी मुंगीला जगण्यासाठी २०°C तापमान लागतो.
७. पावसाळ्यात मुंग्या सुट्टीवर असतात – म्हणून नागपंचमीचा सण खऱ्या अर्थाने मुंग्यांसाठीच आहे. नाग म्हणजे त्यांच्या घराचा रक्षक!
पक्षी
१. माळरानावर अनेक पक्ष्यांचा अधिवास असतो – गवतातून फिरताना अचानक तितर आणि त्याची पिल्लं दिसतात.
२. पाखुर्डी हा पक्षी तलावावर छाती भिजवतो आणि पिल्लांसाठी पाणी नेतो – अतिशय हळवा क्षण.
३. पावश्या हिमालयातून आपल्या भागात येतो.
४. चातक आफ्रिकेतून येतो – कोख्या पक्ष्याची अंडी नष्ट करून त्याचं घरटं वापरतो, अगदी कोकिळेसारखं.
मधमाश्या
१. रानातल्या फवारण्या वाढल्यामुळे मधमाश्या आता शहरांकडे स्थलांतर करत आहेत.
२. द्राक्ष, काकडी, आंबा आणि कांद्याची पीकं मधमाश्यांमुळेच यशस्वी होतात.
महेशजींनी सुचवलेली पुस्तकं आणि चित्रपट
- Walden – Henry David Thoreau यांचं पुस्तक – वॉल्डेन तलावा काठी निर्सगाच्या सानिध्यात साधे आयुष्य जगताना आलेल्या अनुभवाचे सुंदर वर्णन या पुस्तकात आहे. हेन्री तिथे दोन वर्ष दोन महिने आणि दोन दिवस राहिले होते.
- Planet Earth – David Attenborough यांचं सूत्रसंचालन असलेली अप्रतिम माहितीपट मालिका.
पृथ्वीच्या इतिहासाच्या प्रमाणात मानवी जीवन काही सेकंदां पुरतं आहे. डॉ. महेश गायकवाड यांच्याकडे निसर्गाचं अफाट ज्ञान आहे.
त्यांचं प्रबोधन हे केवळ माहिती देण्यासाठी नाही, तर निसर्गावर प्रेम निर्माण व्हावं यासाठी असतं.
त्यांचा ठाम विश्वास – “मुलांनी निसर्गात रमावं, कारण चार भिंतींत त्यांना समाजात ‘वारायचं‘ शिक्षण देणं हे अनैसर्गिक आहे.”
ताजाकलाम: हे सगळं सांगत असताना सुबकपक्षी उत्साहाने प्रतिसाद देत होता.
सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१
बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन. 🙂