ऐसे वदले डॉ. नंदू मुलमुले.. 

“मनाचिये गुंती” या स्टँड-अप शोचे ५०० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत

आज मला अशा व्याख्यानाला जायचा योग आला, ज्यामध्ये मानसशास्त्राची आणि तत्वज्ञानाची सांगड अनुभवायला मिळाली. एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडिया अंतर्गत, माननीय खासदार सौ. सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रतिबिंब” हा उपक्रम राबवला जातो. आज डॉ. नंदू मुलमुले यांचे व्याख्यान झाले.

डॉ. मुलमुले यांनी त्यांच्या कार्यक्रमाची सुरुवात थक्क करून टाकणाऱ्या वस्तुस्थितीने केली — भारतात १ लाख लोकांमागे फक्त ०.७५ मानसोपचारतज्ज्ञ आहेत. जेव्हा त्यांनी मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम सुरू केले, तेव्हा ८ तालुक्यांमध्ये ते एकटेच मानसोपचारतज्ज्ञ होते. दिवसाला १०० पेशंट त्यांना भेटायचे. “मानसोपचार” आणि त्याला जोडलेली विशेषणे गहाण आहेत. मानसोपचार सर्वसामान्यांना सहज उपलब्ध असावा, आणि त्यासाठी मानसोपचारासोबत जोडले गेलेलं कटुतेचं कलंक दूर करण्याचा मनसुबा डॉ. मुलमुले यांचा आहे. मानसिक स्थिती सुधारण्यासाठी जनजागृती व्हावी म्हणून त्यांनी महाराष्ट्रामध्ये “मनाचिये गुंती” या स्टँड-अप शोचे ५०० पेक्षा जास्त प्रयोग केले आहेत.

त्यांचे भाष्य ऐकताना – ओशो, ईकीगाई (पुस्तक), लुईस हे आणि खलील जिब्रान यांची आठवण झाली. मला काय भावले आणि काय लाभले, याचा आढावा/सार थोडक्यात मांडतो –

१. वाढती लोकसंख्या मानसिक तणाव निर्माण करत आहे. अति-लोकसंख्येमुळे infrastructure (मूलभूत सुविधा) आणि opportunity (संधी) यांचा अभाव निर्माण होतो. मिळकतीसाठी झालेली गर्दी तणावाचे कारण बनते. सर्वांना समान संधी मिळत नाही आणि संधी न मिळालेला तरुण वर्ग स्वतःला अपयशी समजू लागतो.


२. AI तंत्रज्ञान माणसाशी पैज लावू शकत नाही, कारण त्याच्याकडे माणसाकडे असलेला वेडेपणा नाही. आयुष्यात अद्वितीय यश संपादन केलेली लोकं पिसाटल्यासारखी काम करतात. वाट चुकली तरच नवीन वाट गवसते. पण वेगळं काहीतरी करणाऱ्या माणसांना “वेडं” ठरवलं जातं. मात्र यशस्वी झाल्यावर ते लोकमान्य होतात.


३. गर्भातलं बाळ स्थब्ध असतं. त्याला कशाचीही चिंता वा भ्रांत नसते. ते निर्वाणाच्या स्थितीत असतं. जन्माला आल्यावर ते रडतं कारण ते आयुष्याच्या भोगासाठी जन्म घेत असतं. तिथून पुढचा प्रवास हा परत निर्वाणाकडे जाण्यासाठी असतो. बुद्ध बनण्याकडे असतो. पण बहुतांश लोकांबरोबर तसे होत नाही. कारण –

४. त्या बाळावर अपेक्षेचं दप्तर बांधलं जातं. ध्येय असणं चांगलं आहे, आणि लक्ष गाठण्यासाठी केलेली धडपड देखील योग्य आहे. पण ते मूल यशस्वी झालं तरच ते चांगलं — ही अपेक्षा करणं ठाम आणि घोर चूक आहे. प्रत्येकाची माती आणि गती वेगळी असते. 

 “आनंद हे ध्येय नाही, ही वाटच आनंद आहे” – गौतम बुद्ध

५. लहान मुलं जर अपेक्षांच्या ओझ्याखाली दाबली गेली तर त्यांच्या मनात नवीन वाटा गवसण्याची भीती निर्माण होते. या भीतीमुळे सृजनशीलता मारली जाते. या विळख्यातून मुलांना काढणं फार कठीण होतं. यामुळे विवेक नष्ट होतो आणि मुले वाम मार्गाला लागण्याची शक्यता वाढते.


६. Passion आणि Skill (आवड आणि कौशल्य) या व्यक्तिमत्त्वाच्या वेगवेगळ्या बाजू आहेत. गाण्याची आवड असणं वेगळं आणि गाता येणं वेगळं. आपल्याला काय आवडतं आणि आपल्याला काय करता येतं याची सांगड घालणं महत्त्वाचं आहे. आणि त्यातून उदरनिर्वाह करता आला, तर सोन्याहून पिवळं.


७. तुम्ही स्वतःसाठी निवडलेल्या ध्येयाकडे वाटचाल करा. दुसऱ्यांनी निवडलेल्या ध्येयाचा वेध घेणं कंटाळवाणं काम असतं.


८. सुख आणि आनंद हे भिन्न गोष्टी आहेत. सुख पाच इंद्रियांपुरतं मर्यादित असतं. सुख व्यक्तिसापेक्ष असतं — भुकेल्याला जेवणात सुख आणि बेरोजगाराला नोकरीत. पाहिजे ती गोष्ट मिळाली की माणूस दुसऱ्या गोष्टीत सुख शोधू लागतो. कारण सुखामुळे मेंदूला dopamine मिळतं. Dopamine ची लत लागते. Dopamine मेंदूमध्ये खूप कमी वेळ टिकतो, म्हणून मेंदूला त्याचा सतत पुरवठा करावा लागतो. त्यामुळे आपण सतत सुखाच्या शोधात फिरत राहतो.


९. त्याच्या तुलनेत, आनंद serotonin निर्माण करतो. हे केमिकल तेव्हा बनतं जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काहीतरी करता. समाजाला आणि — महत्त्वाचं म्हणजे — तुम्हालाच याची गरज असते.


१०. जो पैसा तुम्ही खर्च करता तो तुमचा. जो पैसा खर्च करू शकत नाही तो काय उपयोगाचा?


११. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समाधान. आणि समाधान मिळतं स्वीकारातून. स्व-स्वीकारातून आपल्याला जग स्वीकारण्याचं धारिष्ट्य मिळतं. या स्वीकारातून स्वतःला आणि जगाला माफ करण्याचं बळ मिळतं. जग जसं आहे तसं स्वीकारता आलं, की त्यात बदल करण्याची आणि त्याच्याशी भांडण्याची इच्छा नष्ट होते. स्वतःबरोबर असण्याचं समाधान मिळतं.

ताजाकलम: कोल्हापूरवरून बारामतीला राहायला आल्यापासून पहिल्यांदाच सांस्कृतिक कार्यक्रम अनुभवला. आईंनी प्रेरित केलं म्हणून baramati.net वरील हा पहिला ब्लॉग साकारता आला. ओळखीचे चेहरे दिसले, बरं वाटलं. 

माझ्या आई — सुमन साळोखे — यांचा मुलमुले सरांबरोबरचा फोटो जोडत आहे.

सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१

बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन. 🙂