वारीचा आणि ज्ञानेश्वर माउलींचा फारसा काही संबंध नाही
खरं तर हा ब्लॉग प्रकाशित करायचा का नाही असा संभ्रम होता. कारण विषय आणि विषयाची मांडणी ही व्यतीत करण्यापेक्षा अनुभवण्याजोगी होती.
भगिनी मंडळ, बारामतीने डॉ. राहुल देशपांडे यांच्या — “माउलींनी आळंदी का निवडली” या व्याख्यानासाठी बोलावले. सीमा मावशी, संगीत मावशी, डॉ. रेवती संत, देवळे मावशी आणि पौर्णिमा तावरे मावशी (नगरसेविका, बारामती) असे बरेच ओळखीची लोक भेटतील असा हा हेतू साधला. आणि माझ्या आईंचा आग्रह कायम असतो. वारकरी संप्रदायाविषयी, वारी सोडली तर अनेकांना फारसे काही माहिती नसते. या व्याख्यानातून माहिती घेऊन ते कुठेतरी संग्रही ठेवता येईल देखील मनसुबा.
डॉ. देशपांडे मुळे कळले की वारीचा आणि ज्ञानेश्वर माउलींचा फारसा काही संबंध नाही, आणि माउली नाथ संप्रदायातून आले होते. पालखी ही अनेक संप्रदायांना एकत्र घेऊन वाहणारी धारा आहे.
“दुःख माझ्याच गाठीशी का?” असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. पण दुःख देवालातरी चुकले आहे का? कुश-लव रामायण गात असताना समोर असलेला रामच आपला बाप आहे हे त्यांना ज्ञात नव्हते. आणि आपण ज्यांना आलिंगन घालत आहोत ती आपली मुलं आहेत हे रामाला ज्ञात नव्हतं. रामाला दशरथ मुखाला आणि लव-कुशला राम. हे दुःख मानवी आहे आणि आपलं दुःख एवढंच मोठं आहे. म्हणून माणसाने माणसासारखं जगावं. आणि आपला भाबडेपणा आपल्याला माणूस बनवतो.
मी काय, तुम्ही काय आणि ज्ञानेश्वर माउली या दुःखाला मुखाली नाहीत. पण “चंद्रमेंजे अलांछन, मार्तंडजे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु“ असं जेव्हा माउली म्हणतात तेव्हा त्यांचा आशावाद आपल्याला प्रखरतेने जाणवतो. कोणताही डाग नसलेल्या चंद्राची शीतलता आणि सूर्याची तापहीन तेजस्विता ते अपेक्षितात. समाजाने वाळीत टाकलेल्या आणि आईवडिलांनी देहत्याग केलेल्या ज्ञानेश्वर माउलींनी आळंदीमध्ये समाधी घेतली. आपल्या कार्याचं बीजाला अंकुर फुटून त्याला नवपालवी लागतच होती आणि त्यांनी आळंदीमध्ये समाधी घेतली.
ज्ञानेश्वर माउलींनी समाधी घेण्यासाठी आळंदीची निवड का केली या विषयावर डॉ. राहुल देशपांडे यांनी खूप छान माहिती सांगितली.
ज्ञानोबांचे समकालीन सगळे संत पैठणला जायचे. पैठण निवास, त्र्यंबक पेक्षा जास्त मोठं शक्तीपीठ होतं. पैठण सिद्धांची पंढरी होती. पण आळंदी पंढरीपेक्षा जुने शक्तीपीठ आहे. तिथे कोरलेल्या शिलालेखांमध्ये पंढरीपेक्षा जुन्या घटनांचा उल्लेख आढळतो.
आळंदी खूप वेगवेगळ्या अर्थांनी नटलेली आहे. कलीयुगात तिला अलकापुरी म्हणत. ज्या उंबऱ्यावर घडामोडी घडतात त्याला आळंद किंवा आलुंद म्हणतात. दूध तापवायच्या भांड्याला अळूधं म्हणतात. असे आळंदीमधून बऱ्याच अर्थांचे उगम होतात. पण माउलींनी समाधीसाठी आळंदी निवडली याला खूप मोठं कारण आहे. संतांच्या जन्मस्थाना पेक्षा समाधी स्थान खूप महत्त्वाचं असतं.
ज्ञानेश्वर माउली नाथ संप्रदायी होते आणि त्यांचे गुरु आळंदीला होते असं डॉ. देशपांडे यांनी सांगितलं. जिथून गुरूशी नाळ जोडली गेली, तिथे समाधी घेतली गेली असं ते म्हणतात. आळंदी निवडण्यामागे इंद्रायणीचा हे अफाट वाटा आहे. इंद्रायणी मध्यभागी आहे, आणि तिच्या १४, ५ आणि ८ किलोमीटरच्या वर्तुळामध्ये आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वाची स्थाने आढळतात. हे गावे आळंदीपेक्षा जुनी आहेत आणि ज्ञानेश्वर माउलींना हे ज्ञात होते — असा अभ्यास त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन डॉ. देशपांडे यांनी केलाय. कुरकुंड ते शिक्रापूरपर्यंत वाहणाऱ्या इंद्रायणीच्या वर्तुळातील एक महत्त्वाचं स्थान म्हणजे आळंदी.
हा झाला अभ्यासाचा भाग. पण अभ्यास कुठेतरी लागू झाला तर ते ज्ञानात परिवर्तित होतं. ज्ञानोबांकडून काय शिकावं असं विचारता डॉ. देशपांडे म्हणाले, “स्वीकृती आणि क्षणस्त राहणं हे माउलींच्या शिकवणीचं सार आहे.”
आलेली परिस्थिती स्वीकारली की त्याचा त्रास होत नाही. आणि आलेला क्षण जाणार आहे याची उपरती झाली की भावनावश होऊन जगणं संपतं. राहतो तो केवळ आनंदी आनंद. स्थिर, शांत, शीतल.
सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१
बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन. 🙂