About

बारामतीच्या मातीत उभा राहणारा माणूस फार उंच उभा राहतो. त्याचे पाय इथल्या चिखलमातीत घट्ट रोवलेले असतात आणि कर आभाळाएवढे. बारा बलुत्यांची माती ही कर्तृत्वाची माती आहे. वडील बारामतीला आले होते आणि इथे त्यांनी घर केलं. स्वतःचं आणि दोनशेहून अधिक लोकांचं.

मी कोल्हापूरवरून बारामतीला आलो तेव्हा मला कला, खानपान आणि संस्कृती अनुभवायला मिळेल का ही चिंता होती. पण इथे येऊन कळलं की इथेही छान नाटकं होतात, संगीत-गायनाचे कार्यक्रम असतात, आणि इथली चुरून खाण्याची पद्धत मला पचली. इथेच राहायचं ठरवलं.

या सांस्कृतिक उपक्रमांना उजाळा मिळावा, इथल्या कट्ट्यांचा आणि बागांचा अनुभव बारामती व बारामतीपलीकडे ओसंडून वाहावा, हा या ब्लॉगचा मनसुबा आहे.

माझं इतर मराठी लिखाणही इथेच प्रकाशित करत जाईन. आणि नाव बारामती असलं तरी हा ब्लॉग बारामतीपुरता मर्यादित नाही. मराठीत जे काही प्रस्तुत होतं आणि अनुभवायला मिळतं ते सगळं इथे व्यक्त होईल, अशी इच्छा बाळगतो.

माझ्यातलं कोल्हापूर कधी जाणार नाही. मी जिथे आहे तिथेच कोल्हापूर आहे. कोल्हापूर आता एखादं गाव राहिलं नाही माझ्यासाठी. गाव म्हणून कोल्हापूरमध्ये माझं काही नाही राहिलं. छोटंसं शेत आहे पन्हाळ्याला, पुढेमागे काही वावर होईल तो तिथेच. कोल्हापूरमध्ये रस्ते होताना दिसत नाहीत अजून तरी. रस्ते झाले तर जात जाईल. तोपर्यंत इथेच विरंगुळा, इथेच रेंगाळ.