आज मी देव पाहिला
परेशजी आणि त्यांचा परिवार त्यांच्या सुकून बंगल्यावर दर महिन्याला एक सांस्कृतिक कार्यक्रम घेतात. यावेळी माझ्या पन्हाळ्याच्या मैत्रीण रुचिका खोत येणार म्हटल्यावर जाणे भाग होते. खोत कुटुंबियांसोबत आमचे संबंध बांधला बांध लागून आहेत. पण रुचिकाताईंचे काम बघण्याचे औचित्य कधी लाभले नव्हते. परेशजींच्या तुळशीकट्ट्यामुळे ती संधी मिळाली. सुकून खूप सुंदर आहे. परेशजींचा परिवार खूप आपुलकीने ही जागा खेळीमेळीची ठेवतो आणि इथे नाटक, कलाकृती बघण्याचा अनुभव अद्वितीय ठरतो.

वगळवाडीच्या माळरानाचं रांगडं सौंदर्य नेसलेला ‘सुकून’
मराठी संत वाङ्मय एक वाहणारी महानदी आहे. भिन्न सांप्रदायिक विचारधारा या नदीला येऊन मिळतात. या नदीचे पाणी उंजळीत घेऊन तहान भागत नाही. या नदीचे तीर सोडावे लागतात आणि या नदीमध्ये वाहावे लागते. देहभान, मनभान सगळंच विसरून ही नदी होता येते. या नदीमध्ये भक्तीरस वाहत असला तरी, ही नदी सगळ्यांना समतेच्या अथांग सागराकडे घेऊन जाते. रुचिका खोत यांची कीर्तावनी त्या नदीकाठची धार आहे—सतत बदलणारी आणि अजूनच धारदार होत जाणारी, नदीमध्ये उडी मारायला लावणारी आणि सागराकडे घेऊन जाणारी.
या सागरामध्ये आज दोन अश्रू दुःखाचे आणि दोन अश्रू सुखाचे मिसळले आणि मी पण देहभान हरपून बघत बसलो. आज मी देव पाहिला. कीर्तावनीने तो ग्रंथामधून आणि मंदिराच्या गाभाऱ्यामधून मंचावर आणला. वाङ्मय, भारूड, भजन, अभंग अशा लोककलांच्या अंगाने कल घेत रुचिका खोत आणि स्वामीराज भिसे यांनी त्या पांडुरंगाला आकार दिला. ज्ञानोबा ते साने गुरुजी असा लोकजागराचा गजर या कलाकृतीमध्ये आहे. गाळ्यामधल्या टाळामध्ये आणि पायामधल्या चाळामध्ये तोच विठ्ठल आहे याची प्रचिती आली.
त्या त्या काळातल्या संतांनी लोककल्याणासाठी जे काही योग्य ते काम हाती घेतले होते. ज्ञानेश्वर माउलींनी कलम हाती घेतले आणि गीता मराठीत आली. एकनाथांनी खिलजीच्या सल्तनीमध्ये खड्ग, तर तुकोबांनी शिवरायांच्या राजवटीमध्ये लोकांना एकत्र आणण्याचा विडा उचलला. काळाच्या आवेगाने माध्यमं बदलली, वारीमधली लोकं बदलली, या वाऱ्यांमध्ये विठोबा तिथेच उभा राहिला, कंबरेवर हात ठेऊन. कीर्तावनी हे देवामधल्या देवपणाला समकालीन माध्यमातून बोलकं करणारा अविस्मरणीय अनुभव आहे.

परेशजी आणि समीक्षाजी – तुळशीकट्टा, सुकून.
हिमशिख प्रस्तुत -किर्तावनी वारी आडवाटंच्या विठोबाची
■ संहिताबांधणी आणि दिग्दर्शन – ऋचिका खोत
■ संशोधन सहाय्य – स्वामीराज भिसे
■ दिग्दर्शन सहाय्य- ज्ञानराज होले
■ संगीतदिग्दर्शन आणि संगीतसाथ – समिरण बर्डे,आदित्य मराठे ,ज्ञानराज होले
■ कलाकार – ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे
■ पोस्टर डिझाईन – निरज सबनीस
______________
सत्यजित साळोखे
बारामती
८३७९९०५१५१
बारामती, कोल्हापूर आणि पुण्यामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती द्यायची असल्यास मला WhatsApp करा. कामातून सवड मिळाली तर नक्की येईन. 🙂